Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी देशात स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली. तर यंदाच्या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेश राज्यासाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी “आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 2014 मध्ये केलेल्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद केली.” यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त करत यंदाही अर्थसंकल्प हा प्रगतशील असल्याचे सांगितले.
अर्थसंकल्पाला बोलताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले, ”आंध्र प्रदेशातील लोकांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राज्याच्या गरजा ओळखल्याबद्दल आणि राजधानी पोलावरम, औद्योगिक केंद्रांवर लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांचे आभार. केंद्राच्या या पाठिंब्यामुळे आंध्र प्रदेशच्या पुनर्रचनेत मोठी मदत होईल.”
टीडीपी नेते लोकेश नारा म्हणाले, ”आंध्र प्रदेशसाठी हा नवा सूर्योदय आहे. राज्यातील जनतेसाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे की आमच्या संघर्षाला मान्यता मिळाली असून औद्योगिक विकास, पायाभूत सुविधा, सिंचन आणि मानव संसाधन विकास यासारख्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश करणारे विशेष आणि व्यापक पॅकेज देण्यात आले आहे. नव्या राज्याच्या इतिहासातील आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आपल्या स्वप्नांचे राज्य निर्माण करण्यासाठी एकत्रितपणे पुढे जाण्याचे हे पहिले पाऊल आहे.”
आंध्र प्रदेशच्या पुनर्बांधणीसाठी 2024-25 या आर्थिक वर्षात 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या आर्थिक वर्षात आंध्र प्रदेशच्या पुनर्बांधणीसाठी 15,000 कोटी रुपये, पोलावरम (प्रोजेक्ट लाइफलाइन) साठी अतिरिक्त निधी, यावर्षी विझाग-चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी निधी आणि सात मागास जिल्ह्यांसाठी विशेष निधी जाहीर करण्यात आला आहे.