Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा उपोषणाला बसले होते. मात्र, आता त्यांच्याविषयी एक मोठी माहिती समोर येत आहे. जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी याबद्दल माहिती दिली.
यावेळी त्यांनी उपोषण स्थगित करण्यामागचे कारणही सांगितले. काल त्यांची तब्येत ढासळल्याने उपस्थित गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला, त्यानंतर आज त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘सलाईन लावून बेगडी उपोषण करण्यात अर्थ नाही…मी उपोषण करायला तयार आहे. पण गावकऱ्यांनी मला उपचार घेण्यासाठी तसेच पाणी पिण्यासाठी आग्रह करायचा नाही. विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे. सलाईन लावून उपोषण करण्यात अर्थ नाही. असे ते म्हणाले. पडून राहण्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं” असंही जरांगेंनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, “तुम्हाला दोन महिने हवे होते, त्यानुसार मी १३ ऑगस्टर्यंतची मुदत देतो. तुम्ही म्हणाला होता त्याप्रमाणे दोन महिन्यात दिलेला शब्द पाळा.”
मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे १३ जुलैपासून उपोषणाला बसले होते. मात्र, त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सरकारने मनोज जरांगें यांच्याकडून दोन महिन्याची मुदत मागितली होती. मात्र, मनोज जरांगे यांनी सरकारला १३ जून ते १३ जुलैपर्यंत एक महिन्याचा अवधी दिला होता. १३ जुलैपर्यत सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढल्यामुळे मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले होते.