Kamala Harris : अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी पुढील निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस या पुढील अध्यक्षपदाच्या उमेदवार असू शकतात, अशी अटकळ बांधली जात होती. जो बायडेन यांनीही त्यांच्या नावाचे समर्थन केले. आता CNN च्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवारी जिंकण्यासाठी पुरेशा डेमोक्रॅटिक प्रतिनिधींचा पाठिंबा मिळवला आहे. कमला हॅरिस यांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी 1976 हून अधिक प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला आहे.
बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर 36 तासांच्या आत कमला हॅरिस यांना त्यांच्या पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे. ही माहिती देताना त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माझ्या पक्षाचा उमेदवार होण्यासाठी आवश्यक पाठिंबा मिळाल्याचा मला अभिमान आहे. पुढील काही महिन्यांत मी देशभर फिरेन आणि प्रत्येक मुद्द्यावर अमेरिकनांशी बोलेन. मला विश्वास आहे की मी माझा पक्ष आणि देश एकत्र करून ट्रम्प यांना पराभूत करेन.”
दरम्यान, बायडेन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी कमला हॅरिस यांना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर देणगीदारांनी प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या द्यायला सुरुवात केली आहे. कमला हॅरिस यांच्या प्रचारासाठी अवघ्या २४ तासात ८१ दशलक्ष डॉलरचा निधी जमा झाला आहे. बायडेन यांच्या प्रवक्त्याने केविन मुनोझ यांनी ही माहीती दिली.
डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटी आणि संयुक्त निधी संकलन कमिट्यांच्या माध्यमातून या देणग्या गोळा केल्या गेल्या आहेत. कमला हॅरिस यांच्या प्रचारासाठी मिळालेला हा प्रतिसाद पाहून जनतेच्या मनात कमला हॅरिस यांनीच अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची इच्छा होती, असे दिसते आहे. डेमोक्रॅटिक पक्षाची अधिकृत उमेदवारी पुढील महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनामध्ये अधिकृतपणे जाहीर केली जाईल.