मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले. दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वी अंतरवली सराटी येथे सुरू केलेले आंदोलन आज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरक्षण देण्यासाठी १३ ऑगस्टपर्यंत सरकारला त्यांनी मुदत दिली आहे. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. पुणे कोर्टाने जरांगे पाटलांविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे. नक्की हे कसले प्रकरण आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.
पुणे शहरातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध आणि अन्य दोघांविरुद्ध कोथरूड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सुनावणीस हजर न राहिल्याने कोर्टाने जरांगे पाटलांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे. जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाचे आयोजन केले होते. मात्र त्याचे संपूर्ण पैसे न दिल्याचा आरोप करत नाट्यनिर्मात्याने जरांगे पाटील व दोघांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र या प्रकरणाच्या सुनावणीस हजर न राहिल्याने पुणे कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणी कोर्टाने जरांगे पाटील यांना दोन वेळा समन्स बजावले आहे. आंदोलनाच्या कारणामुळे ते कोर्टात हजर राहिले नव्हते. मात्र आता कोर्टाने वॉरंट जारी केले आहे. दरम्यान हा सगळं डाव देवेंद्र फडणवीसांचा असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. मला तुरुंगात टाकण्याचा व तिथे मला मारण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा यावरून आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.