Mohammed Shami : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मागील काही काळात फॉर्ममध्ये नव्हता तेव्हा त्याला अधिक काळ टीम इंडियाच्या बाहेर बसावे लागले होते. तसेच या काळात तो डिप्रेशनमध्ये गेला होता, व्यावसायिक जीवनासह त्याचे वैयक्तिक जीवन देखील तणावपूर्ण होते.
मधल्या काळात पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. तसेच शमीवर पाकिस्तानी महिलेकडून पैसे घेऊन मॅच फिक्सिंग केल्याचा आरोपही केला होता. मात्र, शमीची या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्या कठीण काळात शमी उमेशच्या घरी राहत होता. शमीच्या या कठीण काळातील धक्कादायक माहिती उमेशने माध्यमांना दिली आहे.
उमेशने शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये एक धक्कादायक माहिती शेअर केली आहे. यावेळी त्याने शमीला जग सोडायचे होत अशी माहिती दिली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? सविस्तर पाहूया…
उमेशने शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये त्या रात्रीचा किस्सा शेअर केला, यावेळी उमेश म्हणाला, ‘त्या दिवशी पहाटेचे ४ वाजले होते. मी पाणी प्यायला उठलो. माझ्या बाटलीत पाणी नव्हते म्हणून मी उठलो आणि स्वयंपाकघरात गेलो. त्यावेळी मी शमीला बाल्कनीत उभा असलेला पहिला. मी १९ व्या मजल्यावर राहत होतो. काय चालले आहे हे मला समजले होते. ती रात्र शमीसाठी भयानक रात्र होती. त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्या रात्री जेव्हा मी शमीकडे गेलो तेव्हा शमीने मला एक गोष्ट सांगितली होती. शमी म्हणाला की, तुम्ही मला मारू शकता, मला शिक्षा करू शकता किंवा मला फाशी देऊ शकता, मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे. पण पाकिस्तानसोबत फिक्सिंगचा आरोप खपवून घेतला जाणार नाही. उमेश पुढे म्हणाला, “मी शमीला त्यावेळी खूप समजावून सांगतिले आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही. आयुष्य पुढे जातं.
आणि एके दिवशी आम्ही दोघे दुपारी गप्पा मारत बसलो असताना अचानक मोबाईलवर मेसेज आला की शमीला क्लीन चिट मिळाली आहे. मला वाटतं तो दिवस शमीसाठी खूप खास होता. कोणताही विश्वचषक जिंकण्यापेक्षा तो कदाचित आनंदाचा दिवस होता. शमीने खूप संघर्ष केला आहे. गाव सोडून त्याने स्वत:चे नाव कमावले आहे. प्रत्येक षड्यंत्र टाळून आणि प्रत्येक कटाला तोंड देत जगाच्या कानाकोपऱ्यात त्याने हे स्थान गाठले आहे. शमी आज जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे.
दरम्यान, शमी सध्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यावेळी त्याला दुखापत झाली होती, फेब्रुवारीमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता मोहम्मद शमी दुखापतीमधून पूर्णपणे सावरला असून लवकरच तो संघात पुनरागमन करणार असल्याचे बोलले जात आहे.