Dhruv Rathee : गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबर ध्रुव राठी चर्चेत आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा एका कारणाने तो चर्चेत आला आहे. मुंबई भाजपचे प्रवक्ते सुरेश करमशी नखुआ यांच्या मानहानीच्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली कोर्टाने यूट्यूबर ध्रुव राठीला नोटीस बजावली आहे. ध्रुव राठीशिवाय जिल्हा न्यायाधीश गुंजन गुप्ता यांनी गुगल आणि एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया हँडलला देखील नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 ऑगस्ट रोजी होणार आहे.
कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान, नखुआ यांची बाजू मांडणारे वकील राघव अवस्थी आणि मुकेश शर्मा यांनी ध्रुव राठीवर ‘माय रिप्लाय टू गोदी यूट्यूबर्स’ या YouTube व्हिडिओमध्ये बदनामीकारक आरोप केल्याचा आरोप केला. याचिकेत म्हटले आहे की, ध्रुव राठीने नखुआचे वर्णन हिंसक ट्रोलर म्हणून केले आहे. नखुआ यांनी याचिकेद्वारे ध्रुव राठी यांच्याकडून 20 लाख रुपयांच्या दंडाची मागणी केली आहे.
याचिकेत म्हटले आहे की, ध्रुव राठी यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये दावा केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंकित जैन, सुरेश नखुआ आणि तेजेंदर बग्गा यांसारख्या हिंसक ट्रोलर्सना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आमंत्रित केले होते. ध्रुव राठीच्या त्या व्हिडिओला 24 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत तर 2.3 दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत. याचिकेत म्हटले आहे की, जसजसा वेळ जातो आहे तसतसे या व्हिडिओचे व्ह्यूज आणि लाईक्स वाढत आहेत.
ध्रुव राठीच्या या व्हिडीओमुळे त्यांची प्रतिमा खूप खराब झाल्याचे नखुआ यांनी म्हटले आहे. या व्हिडिओमुळे लोकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर त्याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. याचिकेत म्हटले आहे की, ध्रुव राठी सातत्याने लोकांची बदनामी करत असून तो त्याच्या फॉलोअर्सद्वारे ऑनलाइन धमक्याही देतो. ध्रुव राठीला ट्विटरवर पुढील व्हिडिओ पोस्ट करण्यापासून रोखावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.