राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे, कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात कोसळधार होत आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अनेक धरणे भरली आहेत. दरम्यान पुण्यात देखील अत्यंत मुसळधार पाऊस सुरु आहे. आज देखील पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पुणे शहरात कातपासून पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले आहे. पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे. नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दरम्यान मुसळधार पावसामुळे शाळां सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सिंहगड रास्ता परिसरात पाणी भरल्याने तेथील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. छातीच्या लेव्हलपर्यंत पाणी आल्याने नागरिकांच्या रेस्क्यूसाठी बोटींचा वापर करण्यात आला आहे.
हिंगणे खुर्द, साई नगर येथे डोंगरमाथ्या वरुन मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने घरात पाणी शिरल्याने अग्निशमन दल रवाना झाले आहे. वडगाव शेरी, आनंदनगर बसस्टॉप येथे एका वाहनावर झाड कोसळले. सुदैवाने वाहनात असलेली शाळेची मुले व वाहनचालक सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन पुण्यात विस्कळत झाल्याचे पाहायला मिळत आहे.