Pune Rain Updates : पुण्यासह महाराष्ट्र्रात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तसेच अनेक धरणे देखील भरली आहेत. आज पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. सलग सुरु असलेल्या पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच वाहतुकीची कोंडी झाली आहे.
पावसाने खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे. तसेच नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यातील पावसाची स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी महत्वाचे आदेश जरी केले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वेळ पडल्यास लोकांना हेलिकॉप्टरने वाचवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सिंहगड परिसरात पाणी भरल्याने तेथील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. छातीपर्यंत पाणी साचल्याने तेथील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बोटीचा वापर केला जात आहे. तसेच बचावकार्य आजूबाजूच्या परिसरात नागरिकांच्या मदतीसाठी फिरत आहेत. अशास्थितीत लोकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे.