Raj Thackeray : पुढील एक ते दोन महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आता महायुती आणि महविकासआघाडी तसेच इतर पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर महायुती सावधपणे नियोजन करताना दिसत आहेत. आता मनसे देखील विधानसभा निवडणूक लढवणार आहे. याची घोषणा अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
आज मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. यामध्ये राज ठाकरे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी अमेरिका दौऱ्यातील आपला अनुभव देखील सांगितला.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांना सत्तेत बसवायचं आहे. जवळपास १ ऑगस्टपासून मी माझा महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहे. सर्व मतदारसंघाचं अभ्यास करून, उमेदवारांचा आढावा घेऊन मगच तिकीट वाटप केले जाणार आहे. तसेच आपण विधानसभेच्या २२५ ते २५० जागा लढवायच्या आहेत, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. यावरून विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.