Raj Thackeray : पुढील एक ते दोन महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी या विधानसभा निवडणुकीत कुणाला तिकीट देणार याचं सूतोवाचही केला आहे.
तसेच त्यांनी जे पक्ष सोडून जाऊ इच्छितात त्यांना चांगलंच फटकारलं आहे. ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे त्यांनी खुशाल जावं मी स्वत: रेड कार्पेट घालतो असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
पुढे बोलताना म्हणाले, “यावेळची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. सध्या कोण कोणत्या पक्षात आहे हे काही समजत नाही. पण येत्या विधानसभा निवडणुकीत मोठं घामासन होईल. सर्व राजकीय पक्षांमध्ये जे काही घमासान होईल ते न भूतो असेल, असं भाकीतही राज ठाकरे यांनी वर्तवलं आहे.
तसेच राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर १ ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत. सर्व मतदारसंघाचं अभ्यास करून, उमेदवारांचा आढावा घेऊन मगच तिकीट वाटप केले जाणार असल्याचे ते बोलले. तसेच आपण विधानसभेच्या २२५ ते २५० जागा लढवायच्या आहेत, असेही सांगितले. यावरून विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.