Pune Weather : पुणे शहरात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने नद्यांना पूर आला आहे. पुण्यात बुधवारी रात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाली. अशास्थितीत पुण्यातल्या अनेक भागांमध्ये पाणी भरले, तसेच अनेकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. सकाळपासूनच प्रशासन कामाला लागले असून, पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम चालू आहे.
अशातच पुण्यातील पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पुण्यातील सिंघगड रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, तेथील घरांमध्ये देखील पाणी शिरले आहे. या परिस्थितून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी सिंहगड रस्त्यांवर NDRF चे 40 जवानही तैनात केले आहेत.
अजित पवारांचे आवाहन
गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होत असल्याने नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर न पाडण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदी, नाले, ओढे, धरण, पूरस्थिती असलेल्या सखल भागात जाणे टाळावे. पर्यटकांनी पुढील दोन दिवस टेकड्या, डोंगर, धबधबे अशाठकाणी जाणे टाळावे असेही आवाहन केले आहे.