Heavy Rainfall in Kolhapur : राज्यात अत्यंत मुसळधार पाऊस कोसळत आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिदधरामय्या आणि उपमख्यमंत्री डिके शिवकुमार यांची भेट घेतली आहे.
पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तसेच कोयन धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने कोयनेतून कधीही विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगली कोल्हापूरला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी अलमट्टी धरणाच्या पाण्याच्या योग्य नियोजन करावे अशी मागणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
महापुराची परिस्थिती उद्भवू नये, या पद्धतीने अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचे आवश्यक ते नियोजन करण्याची सूचना संबंधित अधिकारी व विभागांना करावी, अशी विनंती सतेज पाटील यांनी निवेदनातून कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उमुख्यमंत्री यांना केली आहे.
सतेज पाटील यांचे निवेदनाला उपुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाला तशा सूचना देखील दिल्या आहेत.
दरम्यान, राधानगरी धरण पूर्ण भरल्याने धरणाचे सर्व दरवाजे उघडले गेले आहे. भोगावती नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. तर पंचगंगा धोका पातळीच्या वरून वाहत आहे. तसेच कोयनेटून देखील विसर्ग सुरू झाल्यास महापुराची भीती वाढणार आहे. एकीकडे पावसाचा जोर वाढत आहे,त्यामुळे सतेज पाटील यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.