Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा जोर कायम आहे. सलग चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले, धरणे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तसेच सिंघगड भागातील रस्त्यांवर आणि घरांमध्ये पाणी साचले आहे. विविध ठिकाणी बचाव कार्य सुरु असून, पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. पुण्याच्या या परिस्थितीचा वेळोवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आढावा घेत आहेत.
दरम्यान, पुण्याची स्थिती पाहता अजित पवार स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी एकता नगर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी तेथील स्थानिक नागरिकांसोबत बातचित केली तसेच त्यांना धीर दिला. यावेळी नागरिकांनी अजित पवारांकडे तक्रारी देखील केल्या.
यावेळी एक महत्त्वाची तक्रार नागरिकांनी केली. खडकवासला धरणातून पाणी सोडताना सूचना का दिल्या नाहीत? असा सवाल नागरिकांनी अजित पवारांना केला. यावर अजित पवारांनी उपस्थित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. यावेळी काही अधिकाऱ्यांनी सूचना केल्या असल्याचं सांगितलं. पण संबंधित परिसरात तशी अनाउंसमेंट झाली नसल्याची तक्रार काही नागरिकांनी केली.
दरम्यान, अजित पवारांनी नागरिकांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “तळमजल्यावरील घरांमध्ये पाणी गेलेलं आहे. काही दुकानांमध्ये पाणी गेलं आहे. आता मी आयुक्तांना पंचनामे करायला सांगितले आहे. दहा-पंधरा दुकाने आणि 80 ते 85 घरांचं नुकसान झालं आहे. पंचनामे केले जातील आणि सरकारकडून योग्य ती मदत केली जाईल”, असं आश्वासन यावेळी अजित पवारांनी दिलं आहे.