Mumbai-Pune Express : पुण्यासह महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईत देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्ववभूमीवर शाळा, महाविद्यालये, कार्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत, अशातच आता मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान धावणाऱ्या काही एक्सप्रेस रद्द करण्याचाही निर्णय मध्य रेल्वे प्रशासने घेतला आहे.
बदलापूर आणि वांगणी दरम्यान उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज घेऊन या एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मध्य रेल्वे सांगितले आहे. तसेच मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस, मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस आणि पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सकाळी पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द असतील. असे देखील सांगण्यात आले आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस पुणे-मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याच पार्श्ववभूमीवर रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.