पुणेकरांसाठी आजचा दिवस थोडासा चांगला आहे असे म्हणायला हरकत नाही. याचे कारण पडणाऱ्या पावसाने घेतलेली विश्रांती. काल आलेल्या महापुराने पुणेकरांची दाणादाण उडवली होती. मात्र काल रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान खडकवाला धरणातून पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे. खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग कमी करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. मात्र आज पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवायचा कि कमी करायचा याचा निर्णय केला जाणार आहे.
काल मुसळधार पाऊस आणि धरणातील मोठा विसर्ग यामुळे सिंहगड रस्त्यावरील एकतानगर, निंबजनगर या ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यामध्ये अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पुण्यात विविध ठिकाणी लष्कराच्या आणि एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गरज पडलयास लोकांना एअरलिफ्ट करावे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिल्या आहेत. तर काल उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार हे देखील ऑन फिल्ड जाऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच आवश्यक त्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आता ३१ हजारांवरून १३ हजारांपर्यंत आणण्यात आला आहे. खडकवासला धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यासह महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईत देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्ववभूमीवर शाळा, महाविद्यालये, कार्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत, अशातच आता मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान धावणाऱ्या काही एक्सप्रेस रद्द करण्याचाही निर्णय मध्य रेल्वे प्रशासने घेतला आहे.