Heavy Rain : महाराष्ट्र्रात पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरी देखील गेल्या दोन दिवसापासून सलग सुरु असलेल्या पावसामुळे मुंबई-पुण्यासह अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीतला कर्जत तालुक्यातील एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कर्जत तालुक्यातील टाकवे येथील एक तरुण उल्हास नदीच्या महापूरात अडकलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. मासेमारी करताना या तरुणाचा पाय घसरला आणि तो नदीपात्रात पडला आणि उल्हास नदीच्या पाण्यात वाहून गेला. पाणी त्याला वाहून नेत असताना तरुणाने हिंमत हारली नाही. तरुणाच्या या हिंमतीला तात्काळ बचाव पथकाने साद दिली. आणि या तरुणाचा जीव वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुण जवळपास 3 ते 4 चार तास पुराच्या पाण्यात अडकून होता. पुराच्या पाण्यात वाहून तरुण एका नजीकच्या गावाजवळ पोहचला आणि झाडाची मदत घेत तेथे तग धरून थांबून राहिला. नदी जवळील उपस्थित लोकांनी आरडाओरडा सुरु केला. नंतर ही माहिती मिळताच कर्जत तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांनी खोपोली येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले. या टीमने गुरुनाथ साठलेकर यांच्या नेतृत्वाखाली किमान ३०० मिटर आत जावून झाडाच्या साहाय्याने पुरातून या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सुखरूप बाहेर काढले. बचाव पथकाच्या या कामगिरीचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.