Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यामागे इराणचा कट असल्याचे अनेक अहवाल समोर आले आहेत. यावर ट्रम्प यांनी गुरुवारी सोशल मीडिया पोस्ट करत प्रतिक्रिया दिली, जर इराणने मला मारले तर अमेरिकेने इराणचे नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकावे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले, “जर त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्पला मारले, तर मला आशा आहे की अमेरिका इराणला जगाच्या नकाशावरून पुसून टाकेल. जर असे झाले नाही तर अमेरिकन नेत्यांना ‘कायर’ मानले जाईल.
अलीकडेच एका रॅलीत ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता, या गोळीबारात उपस्थितांपैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर इतर दोन जण जखमी झाले आहेत. मात्र, या हल्ल्यामागे इराणचा कट होता याची पुष्टी झालेली नाही. तसेच इराणनेही आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
माहितीसाठी, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात 2018 मध्ये इराणसोबत माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या JCPAO अणुकरारातून अमेरिकेला बाहेर काढले होते. यासोबतच अनेक कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता.
2020 मध्ये अमेरिकन ड्रोन हल्ल्यात कासिम सुलेमानी यांची हत्या झाल्यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराण सरकारने ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातील सदस्यांना अनेक धमक्या दिल्या आहेत. तर 2022 मध्ये इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी या प्रकरणी ट्रम्प यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल करण्याबाबत बोलले होते. यासोबतच गुन्हा दाखल न केल्यास बदला घेऊ, अशी प्रतिक्रिया दिली होती.