Heavy Rains : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु होती. मात्र आज पावसाने विश्रांती घेतली असून, नागरिकांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे. अशातच खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग आज सायंकाळी ४ वाजता पूर्णपणे बंद करण्यात आला, तसेच आवश्यकतेनुसार यात बदल संभवू शकतो अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली आहे.
पुणे, कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अनेक धरणे भरली आहेत. खडकवासला धरण देखील पूर्ण क्षमतेने भरले असून खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता. अचानक धरणातले पाणी सोडल्यामुळे अनेक पुणेकरांच्या घरात पाणी शिरले तसेच अनेकांचा संसार मोडला.
काल खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे सिंहगड रास्ता परिसरात पाणी भरले होते. तसेच तेथील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते, या पाण्यात अनेक नागरिक अडकले होते. नागरिकांच्या रेस्क्यूसाठी काल एनडीआरएफचे ४० जवान येथे तैनात करण्यात आले होते.