राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे, मुंबई, कोकण भागात अति ते अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र कालपासून पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे. मात्र सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान सांगलीत कृष्ण नदीने इशारा पातळी गाठली आहे. सध्या सांगलीत कृष्णा नदीची पातळी ४० फुटांवर पोहोचली आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस असल्याने कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान कृष्णा नदीची पाणी पातळी ४० फुटांवर गेली आहे. त्यामुळे सांगलीत लष्कराची एक तुकडी दाखल झाली आहे. तसेच सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
तर दुसरीकडे राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पंचगंगा नदीची पातळी ४७ फुटांवर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील ९४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीचे पाणी आंबेवाडी येथे आले आहे. त्यामुळे रत्नागिरी- कोल्हापूर महामार्ग करण्यात आला आहे. दरम्यान आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु होती. मात्र आज पावसाने विश्रांती घेतली असून, नागरिकांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे. अशातच खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला, तसेच आवश्यकतेनुसार यात बदल संभवू शकतो अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली आहे.