नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी बिडेन यांनी डेमोक्रॅटिक पक्षातून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. 23 जुलै रोजी कमला यांनी राष्ट्रपती पदाचे उमेदवार होण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या आवश्यक प्रतिनिधींचा पाठिंबा मिळवला. आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबाला यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी कमला हॅरिस यांना फोन करून याबाबत माहिती दिली.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये बराक आणि मिशेल कमला हॅरिस यांना पाठिंबा देण्याबाबत बोलताना दिसत आहेत. यानंतर कमला हॅरिस आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. बराक ओबामा म्हणाले, मी त्यांना जिंकण्यासाठी आणि व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण मदत कारेन. यानंतर कमला हॅरिस यांनी ओबामा दाम्पत्याचे आभार मानले आणि त्यांच्या अनेक दशकांच्या मैत्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कमला हॅरिस फोनवर म्हणाल्या, तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
याआधी अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात मिशेल ओबामा यांना डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बनवण्याची अटकळ होती. पण मिशेल यांनी एका मुलाखतीत राजकारणापासून दूर राहणार असल्याचे सांगत सर्व अटकळ फेटाळून लावल्या होत्या. कमला हॅरिस यांच्या उमेदवारीवर ओबामा खूश नसल्याचा दावाही अनेक प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आला होता. पण आता ओबामा दाम्पत्याने कमला हॅरिस यांना पाठिंबा दिल्यानंतर सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. आता डेमोक्रॅटिक पक्षात अध्यक्षपदाचा उमेदवार निवडण्यासाठी १ ऑगस्टला मतदान होणार आहे. यामध्ये कमला हॅरिस यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.