Maharashtra Governor : महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले आहेत. झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील, जे 18 फेब्रुवारी 2023 पासून राज्यपाल आहेत.
झारखंडमध्ये सी.पी. राधाकृष्णन यांच्या जागी भाजपचे ज्येष्ठ नेते संतोष कुमार गंगवार यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.
कोण आहेत सी.पी. राधाकृष्णन?
सीपी राधाकृष्णन यांची नियुक्ती ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली. राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या वरिष्ठ आणि सन्मानित नेत्यांपैकी एक आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. तसेच केरळचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. ते तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.
राधाकृष्णन यांनी 1998 आणि 1999 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 18 फेब्रुवारी 2023 रोजी ते झारखंडचे राज्यपाल झाले.