Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने पहिलं पदक जिंकलं आहे. भारतीय नेमबाज मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. यासह मनू भाकरने इतिहासही रचला आहे. मनू भाकर ही या स्पर्धेत कांस्यपदक मिळवून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.
या स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य पदके दक्षिण कोरियाच्या दोन खेळाडूंनी जिंकली. ओ ये जिनने 243.2 गुणांसह सुवर्णपदक जिंकले आणि किम येजीने 241.3 गुणांसह रौप्य पदक जिंकले. तर मनू भाकरने कांस्यपदक जिंकत भारताचा 12 वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवला. 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग आणि विजय कुमार यांनी नेमबाजीत पदके जिंकली होती.
मनू भाकरची ही दुसरी ऑलिम्पिक आहे. याआधी तिने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदार्पण केलं होतं. 10 मीटर एअर पिस्तुल फेरीत तिचे पिस्तुल तुटले होते. त्यामुळे ती पदकापासून वंचित राहिली होती. मात्र, तिने जिद्द न हरता पुन्हा नव्याने सुरुवात केली. आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पदक जिंकून सर्वांना दाखवून दिले.