Pune Flood : पुण्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे संसार पाण्यात गेले तर काहींना आपला जीव गमवावा लागला. या पुरात अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खडकवासला धरणक्षेत्रातून अचानक मध्यरात्री पाण्याचा विसर्ग वाढवल्याने नदीला मोठा पूर आला होता. या पुरात नदीकाठच्या सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी शिरले होते.
खडकवासला प्रशासनाने नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता खडकवासला धरणाचे दरवाजे उघडले होते. यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, पुण्यातील या परिस्थितीला जबादार असणारे पुणे महापालिकेचे सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना निलंबित करण्यात आले आहे. कामाच्या जबाबदारीमध्ये कसूर, कर्तव्य पार पाडताना गुणवत्ता, औचित्य आणि उत्तरदायित्व ठेवले नसल्याचा ठपका ठेवत खलाटे यांचे निलंबन करण्यात आले आहे.
अचानक खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे सिंहगड रास्ता परिसरात मोठ्या पाणी भरले होते. या पाण्यात अनेक नागरिक अडकले होते. पालकमंत्री अजित पवार यांनी स्वतः पूर परिस्थिती निर्माण झालेल्या विभागात पाहणी केली, आणि याला जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करा असे आदेश पालिका आयुक्तांना दिले होते. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी पुणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना निलंबित केले आहे.