WIND vs WSL Final : महिला आशिया चषकमध्ये श्रीलंकेच्या संघाने अंतिम फेरीत भारतीय महिला संघाचा पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने 8 चेंडू राखत एकतर्फी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने श्रीलंका संघासमोर 165/6 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने 2 गडी गमावून ऐतिहासिक विजय मिळवला आणि आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले.
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियासाठी शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी 44 धावांची उत्कृष्ट सलामी भागीदारी केली. शेफाली वर्मा 19 चेंडूत 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. मधल्या फळीत भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले ज्यात कर्णधार हरमनप्रीतने 11 आणि उमा छेत्रीने 9 धावा केल्या.
भारतासाठी शेवटच्या षटकांमध्ये जेमिमा रॉड्रिग्सने 16 चेंडूत 29 धावा केल्या, तर ऋचा घोषने 30 धावांची उत्कृष्ट खेळी करत टीम इंडियाला 150 च्या पुढे नेले. श्रीलंकेकडून कविशा दिलहरीने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या आणि भारताने यजमान संघासमोर 166 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभा केले.
आशिया चषकाचे पहिले जेतेपद पटकावण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर विश्मी गुणरत्ने 1 धावा करून धावबाद झाली पण यानंतर कर्णधार चमारी अटापट्टू आणि हर्षिता समरविक्रमाने 87 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला लक्ष्याच्या जवळ नेले. चामारी अटापट्टूने 43 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 61 धावांची उत्कृष्ट खेळी केली. हर्षिताला साथ देण्यासाठी कविशा दिलहरी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आली. दोघांमध्ये 73 धावांची नाबाद मॅचविनिंग पार्टनरशिप झाली. हर्षिताने 51 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या तर कविशाने 16 चेंडूत 30 धावांची जलद खेळी करत संघाला चॅम्पियन बनवले. भारताकडून दीप्ती शर्माने केवळ 1 विकेट घेतली.