चार दिवसांपूर्वी पुण्याला पुराचा फटका बसला होता. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग कमी करण्यात आला होता. मात्र दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुठा नदी दुथडी भरून वाहत हं. तसेच प्रसिद्ध असा बाबा भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे.
पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणात जवळपास ८६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे धरणातून तब्बल २२ हजार ८८० क्युसेक चा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवला देखील जाऊ शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा पुणेकरांची चिंता वाढली आहे. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे शहरातील प्रसिद्ध असा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे . त्यामुळे पोलिसांनी हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. जुलै महिन्याच्या मध्यानंतर पुणे जिल्ह्यासह खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यावर्षी पहिल्यांदाच पानशेत धरणातून देखील विसर्ग करण्यात आला आहे. खडकवासला धरण क्षेत्रातून करण्यात येणार विसर्ग हा पावसाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करण्यात येणार आहे.