Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीत. सीबीआयने सोमवारी अरविंद केजरीवाल आणि इतरांविरुद्ध मद्य धोरण प्रकरणी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे.
केजरीवाल यांना 21 मार्च 2024 रोजी ED ने कथित मद्य धोरण घोटाळ्यात मनी लाँड्रिंगच्या चौकशीत अटक केली होती. अरविंद केजरीवाल हे तिहार जेलमध्ये असतानाच त्यांना सीबीआयेने २६ जून रोजी कथित भ्रष्टाचार प्रकरणात पुन्हा अटक केली.
दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित सीबीआय प्रकरणात 25 जुलै रोजी राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली होती. या प्रकरणी 8 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. केजरीवाल यांना तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यालयात हजर करण्यात आले होते.
अरविंद केजरीवाल यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि बीआरएस नेत्या के कविता यानांही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. राऊस अव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया आणि के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ जुलैपर्यंत वाढ केली.
याआधी १२ जुलै रोजी सीबीआयमार्फत तपास करत असलेल्या अबकारी धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत शुक्रवारी २५ जुलैपर्यंत वाढ केली होती.