Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत अजित पवार शरद पवार गटाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. त्याचप्रमाणे आता आगामी विधानसभा निवडणुकीतही संपूर्ण राज्याच्या नजरा अजित पवार आणि शरद पवार यांच्या लढतीकडे लागले आहे. राज्यात बारामती, शिरुर लोकभेत राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने सामने आल्याचे पहायला मिळाले. या दोन्ही जागांवर काटे की टक्कर पहायला मिळाली.
आगामी निवडणुकीतही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना पहाला मिळणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटील आणि अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केली. आणि आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही आपला विधानसभेचा पहिला उमेदवार घोषित केला आहे. महायुतीच्या जागावाटपा आधीच अजित पवार गटाकडून आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केल्याने अजित पवारांनी आपला पहिला डाव टाकल्याचे दिसत आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव खासदार तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे २ दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील विविध मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. आज दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचा देखील आढावा सुनील तटकरे यांनी घेतला. यावेळी त्यांनी दिंडोरी मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा केली आहे. यावेळी सुनील तटकरे यांनी दिंडोरीचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून नरहरी झिरवळ शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. तसेच कालच्या बैठकीला देखील आमदार नरहरी झिरवाळ उपस्थित नव्हते. म्हणून अजूनच चर्चेला उधाण आले होते, मात्र याबाबत आता त्यांनी स्वत: आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आपल्या भाषणात नरहरी झिरवाळ म्हणाले की, “मी इच्छुक आहे असं म्हणण्यापेक्षा मी निवडणूक लढावं की नाही हे जनतेने सांगावे. शरद पवार साहेब हे सगळ्यांचे दैवत आहेत. पण राजकारणात घडामोडीनुसार पसंती क्रमांकानुसार पहिल्यापासून मी अजित पवारांसोबत आहे. तीन वेळेस मी त्यांची साथ दिली आहे. पहाटेच्या शपथविधीला देखील मी उपस्थित होतो. भविष्यातही मी दादांसोबतच राहणार आहे,” असे नरहरी झिरवाळ म्हणाले आहेत.