विशाळगडावर बेकायदा बांधकाम हटवण्याच्या कारवाई दरम्यान झालेल्या हिंसाचारात एकूण पाच गुन्हे नोंदवण्यात आले आहेत तर २४ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान जमावाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात १८ पोलीस जखमी झाले होते. त्यातील दोघे गंभीर जखमी झाल्याचा दावा कोल्हापूर पोलिसांनी केला आहे. मात्र, मुसळधार पाऊस व दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती. त्यामुळे दंगलखोरांवर तात्काळ कारवाई करता आली नसल्याची माहिती देण्यात आली आहे .
विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी करीत शाहूवाडी (जि. कोल्हापूर) येथील आयुब कागदी व इतर रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्येष्ठ वकील सतीश तळेकर व डी. माधवी अय्याप्पन यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. बी. पी. कोलाबावाला आणि न्या. फिरदोश पुनिवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात राज्य सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. .
मागील सुनावणीवेळी खंडपीठाने शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्यांना जाब विचारत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शाहूवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय घेराडे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. हा हिंसाचार गजापूर चेक पोस्ट या ठिकाणी झाला. या लोकांकडे काठ्या व शस्त्रे होती; मात्र पोलिसांनी त्यांना विशाळगडावर येण्यापासून रोखले. समाजकंटक आणि शिवभक्त कोण यांच्यात फरक करणे कठीण झाले होते. परिणामी, हिंसाचार सुरू झाला. समाजकंटक आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी जाणारे कोण यांच्यात फरक करणे कठीण झाले होते. परिणामी, हिंसाचार सुरू झाला. या प्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, पुण्यातील हिंदू बांधव समितीचे रवींद्र पडवळ यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु रवींद्र पडवळ फरारी आहेत.
सरकारी वकील ॲडव्होकेट जनरल वीरेंद्र सराफ यांनी या कारवाईत एकही रहिवासी वास्तू पाडण्यात आलेली नाही, तर ज्या व्यावसायिक वास्तूंना न्यायालयाने संरक्षण दिलेले नव्हते अशी ९४ बांधकामे स्थनिकांच्या मदतीने पाडण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. याची दखल घेत सुनावणी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे.