भारताच्या मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. मनू आणि सरबजोत या जोडीने कोरियन संघाच्या ओह ये जिन आणि ली वोंहो यांना पराभूत करून कांस्यपदक जिंकले. दोघांनी हा सामना 16-10 असा जिंकला. यासह भारताच्या पदकांची संख्या 2 झाली आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
दरम्यान याआधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकणारी स्टार नेमबाज मनू भाकर हिला फोन करून तिचे अभिनंदन केले आहे. या पदकासह पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे पदक खाते उघडले आहे. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 221.7 गुणांसह कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे.
मनू भाकरची ही दुसरी ऑलिम्पिक आहे. याआधी तिने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदार्पण केलं होतं. 10 मीटर एअर पिस्तुल फेरीत तिचे पिस्तुल तुटले होते. त्यामुळे ती पदकापासून वंचित राहिली होती. मात्र, तिने जिद्द न हरता पुन्हा नव्याने सुरुवात केली. आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पदक जिंकून सर्वांना दाखवून दिले.