Venezuela Protest : व्हेनेझुएलामध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल आले आहेत. निकोलस मादुरो तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत. निकालानुसार त्यांना 51 टक्के मते मिळाली आहेत. त्याचवेळी विरोधी उमेदवार एडमंडो गोंजालेज यांना 44 टक्के मते मिळाली.
मात्र, या निवडणूक निकालांवर विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. कारण बहुतांश एक्झिट पोलमध्ये विरोधकांच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. एवढेच नाही तर एडमंडो गोंजालेजयांना ७० टक्क्यांहून अधिक मते मिळाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. गोंजालेज यांच्या विजयाची आकडेवारीही त्यांच्याकडे असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
यावरूनच आता व्हेनेझुएलामध्ये मोठा भडका उडाला आहे. 28 रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी व्हेनेझुएलातील विविध शहरे आणि गावांमध्ये निदर्शक एकत्र रस्त्यावर उतरले आणि त्यांनी या निवडणुकीला कडाडून विरोध केला. व्हेनेझुएलामधील राष्ट्रीय निवडणूक प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर आणि रस्त्यावर गर्दी दिसून आली.
मादुरो हे 2025 ते 2031 पर्यंत राष्ट्रपती राहतील. मात्र, मादुरो खोट्या बहुमताने विजयी झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे. अशास्थितीत अमेरिका आणि इतर ठिकाणच्या सरकारांनी या निकालावर संशय व्यक्त केला असून, पुन्हा एकदा मतं मोजण्याची मागणी केली आहे.
मादुरोच्या विजयावर लोक नाराज
मादुरोच्या विजयाने नाराज झालेल्या लोकांनी रस्त्यांवर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी लोकांनी ‘आम्ही याला कंटाळलो आहोत, आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे, आम्हाला आमच्या मुलांसाठी स्वातंत्र्य हवे आहे’ अशा घोषणा दिल्या. शहरात जागोजाग मोर्चा सुरु आहे. तसेच अनेक भागातून जाळपोळीच्याही बातम्या समोर येत आहेत.
तुमच्या माहितीसाठी, या निवडणुकीचा निषेध केला जात आहे कारण लोक मादुरोला कंटाळले आहेत. देशाच्या आर्थिक संकटाबाबत जनतेमध्ये असंतोष आहे. मादुरो हे जवळपास 11 वर्षांपासून देशावर राज्य करत आहेत, अशास्थितीत नागरिक रस्त्यावर उतरून या निवडणुकीच्या विरोधात आंदोलन करत आहेत.