Kerala Landslide News : केरळ सरकारने वायनाडमध्ये भूस्खलनात 84 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मंगळवारी आणि बुधवारी राज्यात शोक जाहीर केला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी वायनाडमध्ये झालेल्या घटनेनंतर आज आणि उद्या दोन दिवसांचा शोक जाहीर केला आहे.
वायनाड भूस्खलनाच्या घटनेतील मृतांची संख्या 84 वर पोहोचली आहे आणि एकूण 116 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, भारतीय लष्कराच्या तुकड्या चूरमाला येथील भूस्खलनाच्या ठिकाणी पोहोचल्या आहेत.
याव्यतिरिक्त, केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती विभागातील राज्यमंत्र्यांचे एक शिष्टमंडळ तिरुअनंतपुरम येथून उड्डाण करत आहे आणि लवकरच घटनास्थळी पोहोचण्याची अपेक्षा आहे. डीएससी सेंटर कन्नूरमधील सुमारे 200 भारतीय लष्कराचे जवान आणि कोझिकोडमधील 122 टीए बटालियनला घटनास्थळी पाठवण्यात आले.
122 टीए बटालियन आता घटनास्थळी पोहोचली असून मदतकार्यात मदत करत आहे. भारतीय नौदलातील ३० तज्ञ जलतरणपटूंची टीम तैनात करण्यात आली आहे. संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरफोर्स स्टेशन सुलूर येथून दोन हेलिकॉप्टरही पाठवण्यात आले आहेत.
एनडीआरएफचे पथकही येथे उपस्थित आहे. एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट एस शंकर पांडियन म्हणाले, “आमची टीम वायनाडमध्ये विविध ठिकाणी तैनात आहेत. कोझिकोडमध्येही दरड कोसळण्याची शक्यता आहे, एनडीआरएफची टीम तिथे तैनात आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पथनामथिट्टा, अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.