अकोल्यात काल मनसे विरुद्ध आमदार अमोल मिटकरी यांच्यातील वाद चांगलाच रंगलेला दिसून आला. आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची मनसे सैनिकांनी तोडफोड केल्यानंतर मनसे सैनिकांवर गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी आमदार अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात काही तास ठिय्या दिला. अखेर चार तासानंतर गुन्हे दाखल झाल्यानंतर आमदार मिटकरी यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. दरम्यान याप्रकरणी,पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फिर्यादीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचेही नाव घेण्यात आले आहे.
तब्बल 4 तासानंतर मनसेसैनिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपल्या जिवाला धोका असून मनसे कार्यकर्त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर आपल्यावर हल्ला केला असल्याचा आरोप यावेळी अमोल मिटकरी यांनी केला. या संपूर्ण घटनेची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. तर या हल्ल्याचा मास्टर माईंड राज ठाकरे आहेत का, याचाही शोध घेतला पाहिजे, असे यावेळी मिटकरी म्हणाले आहेत.
या प्रकरणी संशयित आरोपींमध्ये मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, सौरभ भगत, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडल्याचे समर्थन करत, त्या मनसैनिकांचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हंटले होते. आता मिटकरी यांनी राज ठाकरेंचे नाव घेतल्याने आता मनसे व राष्ट्रवादीतील हा वाद टोकाला गेल्याचा दिसून येत आहे
अमोल मिटकरींनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, मनसे सैनिकांचा पोलिसांनी शोध सुरू केला. भूमिगत झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी चार पोलीस पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.दरम्यान, या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना विचारणा केली असल्याचीही माहिती समोर आली आहे.