Kerala Landslide News : केरळमधील वायनाड या जिल्ह्यात मंगळवारी भूस्खलनाची भीषण घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत, तर अनेकजण आणखीनही मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना मंगळवारी सकाळी मेप्पाडी जवळ घडली. सध्या केरळमध्ये पावसाने थैमान घातले आहे. याच पावसामुळे मेप्पाडी भागातील डोंगराळ भागात भूस्खलन झाले आहे. दरम्यान, वायनाडमधील घटनेनंतर केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या कारचा बुधवारी अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
आतापर्यंत वायनाड भूस्खलनात मृतांची संख्या 151 वर पोहोचली आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी चुरलमालामध्ये बचावकार्य सुरू केले आहे. येथे लष्कराच्या चार तुकड्या बचाव कार्यात गुंतल्या आहेत. एनडीआरएफच्या टीमही लोकांना वाचवण्यासाठी काम करत आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन वायनाडमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
https://x.com/ANI/status/1818479063557984464
वीणा जॉर्ज यांनी मंगळवारी (३० जुलै) आरोग्य विभाग संचालनालयाला भेट देऊन भूस्खलनाबाबत सुरू असलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. केरळच्या आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयानुसार, त्यांनी सद्यस्थितीची माहिती दिली आणि बाधित भागात उपस्थित असलेल्या रुग्णालयांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. गरज पडल्यास तात्पुरते रुग्णालय सुरू करण्याची शिफारसही आरोग्यमंत्र्यांनी केली. मात्र यानंतर भूस्खलनग्रस्त वायनाड दौऱ्यावर जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. आता वीणा जॉर्ज रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.