उरण येथील यशश्री हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला मुंबईतील न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दाऊद शेखला मंगळवारी कर्नाटकच्या गुलबर्गा येथून अटक करण्यात आली होती.दरम्यान त्याच्या विरोधात अॅट्रोसिटी अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई पोलिसांनी आरोपीच्या ताब्याची मागणी केली होती. यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने दाऊदला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस दाऊदची चौकशी करणार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाऊदने आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यानेच यशश्री शिंदेची हत्या केली आहे. त्याने हत्या का केली? त्याचे आणि यशश्री शिंदेचे काय संबंध होते? याबाबत पोलीस घटनाक्रम शोधणार आहेत.
२५ जुलै रौजी उरणमध्ये राहणारी यशश्री बेपत्ता झाली होती. ती बेलापूरमध्ये एका कंपनीत काम करत होती. ती घरी परत न आल्याने वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी यशश्रीचा शोध सुरू केला होता. पोलिसांना यशश्रीचा मृतदेह रेल्वे स्टेशन जवळ आढळून आला. तिच्या मृतदेहाची क्रूरपणे विटंबना करण्यात आली होती.
याबाबत पोलीस अधिकारी साकोरे यांनी अधिक माहिती देत सांगितले की, दाऊद आणि ही युवती यांची ओळख होती. ते एकाच शाळेत होते. दाऊद करोनाकाळात कर्नाटकमध्ये गेल्याने त्यांचा संपर्क तुटला होता. मात्र सध्या तरी या प्रकरणात तो एकच आरोपी असून गुन्ह्यात त्याला कोणी मदत केली का, याशिवाय हत्येचे नेमके कारण काय आहे, आदी प्रकरणी तपास सुरू आहे, असे साकोरे यांनी सांगितले. ही युवती अल्पवयीन असताना दाऊदविरोधात तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
दाऊदचा शोध लागल्यानंतर यशश्री शिंदे हिच्या पालकांनी ही केस कोर्टात फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावी आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी केली आहे.