Kerala landslides : केरळमधील वायनाड या जिल्ह्यात मंगळवारी भूस्खलनाची भीषण घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत, तर अनेकजण आणखीनही मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना मंगळवारी सकाळी मेप्पाडी जवळ घडली.
सध्या केरळमध्ये पावसाने थैमान घातले आहे. याच पावसामुळे मेप्पाडी भागातील डोंगराळ भागात भूस्खलन झाले आहे. आतापर्यंत वायनाड भूस्खलनात मृतांची संख्या 158 वर गेली आहे.
या परिस्थितीत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बुधवारी सकाळी 30 जुलै रोजी भूस्खलन झालेल्या वायनाड जिल्ह्यातील बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, उद्या बोलावण्यात आलेल्या राज्यस्तरीय सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री 1 ऑगस्टला सकाळी वायनाडला पोहोचतील.
वायनाडमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर, DSC केंद्र, प्रादेशिक सेना, NDRF, भारतीय नौदल आणि IAF मधील एकूण 1200 बचाव कर्मचारी आपत्तीग्रस्त भागात तैनात आहेत. तसेच लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे पथक, एनडीआरएफ, पोलीस दल आणि अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्यात सामील झाले आहेत.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पथनामथिट्टा, अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.