काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाप्रती नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जुन्या विधानांकडे लक्ष वेधत ते म्हणाले की, बंगालमध्ये तृणमूलच्या विरोधात मी गप्प कसे राहू शकतो? दिल्लीत काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांची भेट घेतल्यानंतर, पाच वेळा लोकसभेचे माजी सदस्य राहीलेल्या अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसबद्दल मवाळ भूमिका घेतल्याबद्दल अप्रत्यक्षपणे आपल्या पक्षाच्या हायकमांडवर हल्ला चढवला आहे.
चौधरी यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, “पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दररोज मारहाण होत असलेल्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कोण आवाज उठवणार? राज्यातील सत्ताधारी पक्ष दररोज काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करत आहे. अधिकृतपणे इंडिया आघाडीचा भाग असूनही आम्हाला दडपण्याचे प्रयत्न चालूच आहेत”.
ते पुढे म्हणाले की, प्रदेश काँग्रेस कार्यकर्त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची आणि काँग्रेसची कार्यालये ताब्यात घेण्याची तृणमूलची परंपरा सुरू आहे.
चौधरी यांनी लिहिले की, “अशा परिस्थितीत मी तृणमूल काँग्रेसच्या विरोधात गप्प कसे राहू शकतो? असे केल्यास माझ्या तळागाळातील कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. मी ते करू शकत नाही.”
यानंतर त्यांनी पश्चिम बंगालमधील या तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधून राज्यातील वास्तव जाणून घेण्याचे आवाहन पक्षप्रमुखांना केले. ते म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये दररोज संघर्ष करणाऱ्या आणि पक्षाचा झेंडा उंच ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी दिल्ली हायकमांडने बोलले पाहिजे.,त्यांचे मत जाणून घेतले पाहिजे.
राज्यातील तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहीन, असे आश्वासन देऊन त्यांनी आपल्या पश्चिम बंगालमधील अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे सूतोवाच केले आहे.अधीर यांनी पुढे म्हंटले आहे की, “मी माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरेन आणि त्यांचे आंदोलन पुढे नेईन. मी अन्यायाशी तडजोड केली नाही आणि कधीच करणार नाही.”
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच चौधरी यांचे काँग्रेस हायकमांडशी असलेले मतभेद चव्हाट्यावर आले होते, तेव्हा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या वर्षी मे महिन्यात प्रसारमाध्यमांना सरकार स्थापनेसाठी कोणती पावले उचलायची हे ठरवले जाईल, असे विधान केले होते. ते चौधरी यांचे काम नाही. त्यासाठी पक्षाचे हायकमांड आहे.असे म्हणत त्यांनी अधीर रंजन चौधरींवर थेट निशाणा साधला होता. पक्षाच्या हायकमांडच्या निर्णयाचे पालन करावे लागेल किंवा बाहेर जावे लागेल, असाही इशारा खर्गे यांनी चौधरींना दिला होता.
.