काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबईसह कोकण आणि विदर्भातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने १ ते ३ ऑगस्ट दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले आहेत.
पुण्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस तर शहरात मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत यंदा चार महिन्यांत होणारा ८६% पाऊस फक्त दोन महिन्यात झाला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, धरण आणि तलाव क्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. जूनमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने जुलैमध्ये अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे.पुण्यात पावसामुळे साथीचे रोग बळावत असून, झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या झिका रुग्णांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. पावसामुळे डासांची उत्पत्ती होत असून, डेंग्यू आणि मलेरिया यांसारखे आजारही वाढत आहेत.
प्रशासनाने नागरिकांना या रोगांपासून संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुण्यात झिका विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारनेही झिका विषाणूच्या प्रकरणांबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने तात्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन केले असून, नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य द्यावे, असे कळवले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारपासून पुढील दोन-तीन दिवस मुंबई, ठाणे त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.