Supreme Court : कुख्यात गँगस्टर, अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाने पॅरोलवर सुट्टी देण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थिती गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळणं कठीण असल्याचे दिसत आहे. वयाचं कारण देत गवळीच्या वकिलाने सुट्टीची मागणी केली होती. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यात अरुण गवळी यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. त्यांना पुन्हा जेलमध्ये परतावे लागेल, असे आदेश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहे. आता या प्रकरणी नोव्हेंबर महिन्यात सुनावणी होणार आहे.
नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. या गुन्हाअंतर्गत ते नागपूर तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
अरुण गवळी जामसांडेकर हत्याप्रकरणात सध्या नागपूरमधील मध्यवर्ती कारागृहात आहेत. 2006 मध्ये जारी केलेल्या एका शासनाच्या परिपत्रकानुसार शिक्षेत सूट देण्यासाठी गवळी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात राज्य शासनाला चार आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. राज्य शासनाने दिलेल्या कालावधीत कोणताही निर्णय घेतला नाही. यानंतर 8 मे रोजी याप्रकरणी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण दाखल झाल्याने उच्च न्यायालयाने राज्य शासनाला चार आठवड्याचा अतिरिक्त कालावधी दिला.
याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान अरुण गवळी यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. त्यांना पुन्हा जेलमध्ये परतावे लागेल, असे आदेश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहेत.