Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर हे प्रकरण बरेच चर्चेत होते. यूपीएससीची फसवणूक करुन पूजा खेडकर अधिकारी झाल्याचे सांगितले जात होत. यावरच आता UPSC कडून पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. एवढेच नाहीतर यापुढे यूपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये पूजा खेडकर यांना बसता येणार नाही, असंही यूपीएससीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
UPSC ने हे आधीच सूचित केले होते. पूजा खेडकर यांच्यावरील आरोप खरे ठरल्यास तिच्यावर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी यूपीएससीने पूजा खेडकरला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. पूजा खेडकर यांची नागरी सेवा परीक्षा-2022 ची उमेदवारी का रद्द करण्यात येऊ नये? अशी विचारणा नोटीसमध्ये करण्यात आली होती.
पूजा खेडकरने तिचे नाव, तिच्या पालकांची नावे, तिचे छायाचित्र, स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून बनावट ओळखपत्रे बनवल्याची तक्रार यूपीएससीने दिल्ली पोलिसांकडे केली होती. खेडकर यांनी फसवणूक करून परीक्षेला बसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
पूजा खेडकर यांच्यावर काय आरोप आहेत?
आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची पुण्यातून वाशीम येथे बदली करण्यात आली होती, यावेळी पूजा खेडकर सरकारी कार्यालयात स्वतःची ऑडी कार घेऊन यायची. तसेच तिने तिच्या या आलिशान कारवर सरकारी बोर्डही लावला होता.
तसेच प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून स्वत:साठी स्वतंत्र आसनव्यवस्था, कार, निवास आणि हवालदाराची मागणी करत होती. हे इथेच संपले नाही तर पूजाचे वडील दिलीपराव खेडकर यांनी आपल्या मुलीला या सर्व सुविधा देण्यासाठी अनेकवेळा जिल्हाधिकारी कार्यालयावर दबाव आणल्याचा आरोप आहे.
तसेच पूजा खेडकर हिने अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांची चेंबरवरही ‘कब्जा’ घेतला होता. तिथे तिने स्वत:च्या नावाचा बोर्डही लावला होता. या सगळ्या बाबी निदर्शनास येताच जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे याबाबत तक्रार केली होती.