दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याशी संबंधित सीबीआय प्रकरणात राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि बीआरएस नेत्या के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत 9 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी हा आदेश दिला. या तिघांची न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.
या प्रकरणी सीबीआयने 29 जुलै रोजी केजरीवाल यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यापूर्वी २२ जुलै रोजी राऊस अव्हेन्यू कोर्टाने के कविता यांच्याविरुद्ध सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली होती. या प्रकरणी सीबीआयने 11 एप्रिल रोजी कविताला अटक केली होती. याप्रकरणी आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, बीआरएस नेते के. कवितांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने संजय सिंह यांना नियमित जामीन मंजूर केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीत. सीबीआयने सोमवारी अरविंद केजरीवाल आणि इतरांविरुद्ध मद्य धोरण प्रकरणी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे.केजरीवाल यांना 21 मार्च 2024 रोजी ED ने कथित मद्य धोरण घोटाळ्यात मनी लाँड्रिंगच्या चौकशीत अटक केली होती. अरविंद केजरीवाल हे तिहार जेलमध्ये असतानाच त्यांना सीबीआयेने २६ जून रोजी कथित भ्रष्टाचार प्रकरणात पुन्हा अटक केली.