Iran-Israel War : हमास प्रमुख इस्माइल हनीयेह यांच्या हत्येनंतर इराणमधील कोम येथील प्रमुख जामकरन मशिदीच्या घुमटावर लाल झेंडा फडकवण्यात आला आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये पहाटे झालेल्या हवाई हल्ल्यात इस्माइल हनीयेह यांचा मृत्यू झाला. यानंतर आता इराणमधील राजकारण तापलेले दिसत आहे.
हा लाल झेंडा सूडाचे प्रतीक मानला जातो, जो येत्या दिवसात इस्रायलविरुद्ध संभाव्य प्रत्युत्तराच्या हल्ल्याचे लक्षण असू शकते. इस्माइल हनीयेह हे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी इराणमध्ये होते.
हत्येच्या काही वेळापूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या भेटीची छायाचित्रेही समोर आली होती, ज्यामध्ये खमेनी मीडियाने एक व्हिडिओ शेअर केला होता, यामध्ये हनीयेह सर्वोच्च नेत्याला भेटताना आणि त्याला मिठी मारताना दिसले.
दरम्यान, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने हनीयेह हत्येचा निषेध करत एक विधान जारी केले आहे. इराणच्या लष्कराने हमास प्रमुखाच्या हत्येचे वर्णन “गुन्हेगारी आणि भ्याड” असे केले आहे.
गाझामधील अपयश लपवण्यासाठी हल्ला!
रिव्होल्युशनरी गार्डचे म्हणणे आहे की, गाझामधील आपले अपयश लपवण्यासाठी आणि जगाचे लक्ष वेधण्यासाठी इस्रायलने हनीयेहची हत्या केली, जिथे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले इस्रायली सैन्य 9 महिने युद्ध जिंकण्यात अपयशी ठरले आहे. अशा कारवाया करून इस्रायल गाझामधील लहान मुले, महिला आणि वृद्ध लोकांच्या जीवितहानीवरून लक्ष हटवू इच्छित आहे.
लाल झेंड्याचा अर्थ काय आहे?
कोममधील मशिदीवर फडकवलेला लाल झेंडा इराणमध्ये अनेकदा प्रदर्शित केला जातो, हे शहीदांच्या रक्ताचे प्रतीक आहे. हा ध्वज विशेषतः मोहरममध्ये फडकवला जातो. ध्वजावरील अरबी शिलालेख “या ला-थारत अल-हुसैन” असा आहे, ज्याचा अर्थ “बदला घेणार” असे होतो.
जमकरन मशीद इराणची राजधानी तेहरानपासून १२० किलोमीटर अंतरावर कोम शहरात आहे. हे इराणचे पवित्र शहर मानले जाते आणि ते इराणचे शिक्षण केंद्र देखील आहे. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी 1989 मध्ये सत्तेवर आल्यानंतर इराणमधील या मशिदीला महत्त्व दिले जाते.