Anshuman Gaekwad : भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे ७१ वर्षी निधन झाले आहे. अंशुमन गायकवाड हे दीर्घ काळापासून ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. अखेर कॅन्सरसोबतची त्यांची झुंज अपयशी ठरली.
अंशुमन गायकवाडने 1974 मध्ये भारताकडून पदार्पण केले. त्याने भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत. गायकवाड आणि गावस्कर (सुनील) यांची जोडी 1970 च्या दशकात हिट ठरली होती. गायकवाडने आपल्या कसोटी कारकिर्दीत 1985 धावा केल्या आहेत. त्याने 1983 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 201 धावांची उत्कृष्ट खेळी केली, जी त्याची सर्वोच्च धावसंख्याही होती. अंशुमन गायकवाड 1975 आणि 1979 च्या विश्वचषकातही टीम इंडियाचा भाग होता.
विश्वचषकात वनडे पदार्पण
अंशुमन गायकवाडने 1975 च्या विश्वचषकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना हा अंशुमनचा पदार्पणाचा सामना होता. त्या सामन्यात अंशुमनने 46 चेंडूत 22 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात सुनील गावस्कर १७४ चेंडूत ३६ धावा करत नाबाद राहिले.
1970 च्या दशकातील ‘द ग्रेट वॉल’
आज क्रिकेटप्रेमी राहुल द्रविडला द वॉल म्हणून ओळखत असतील, पण 1970 च्या दशकात अंशुमनला द ग्रेट वॉल म्हटले जायचे. आपल्या जबरदस्त फलंदाजीने तो विरोधी गोलंदाजांच्या आक्रमणाला खिंडार पाडण्यात माहीर होता.
दोन वर्षे टीम इंडियाचे प्रशिक्षक
अंशुमन गायकवाड हे जवळपास दोन वर्षे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकही होते. ते प्रशिक्षक असताना भारतीय संघाने 1998 मध्ये शारजाह येथे झालेल्या त्रिकोणी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. अंशुमन 2000 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपविजेता ठरलेल्या टीम इंडियाचा प्रशिक्षकही होता. सौरव गांगुली या संघाचा कर्णधार होता.