Uttarakhand Weather : दिल्लीसह देशातील अनेक राज्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काल 31 जुलै रोजी दिल्लीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, हिमाचलमधील कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी झाली असून त्यात सुमारे 44 लोक बेपत्ता आहेत, आणि ९ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या टिहरी गढवाल भागातही ढग फुटण्याच्या घटना घडल्या आहेत.
हिमाचल प्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. कुल्लू आणि मंडी जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. कुल्लूच्या रामपूर भागातील समेज येथील पॉवर प्लांट प्रकल्पातील अनेक बेपत्ता आहेत. 20 हून अधिक घरे जमीनदोस्त झाली असून अनेक वाहने वाहून गेली आहेत, परिसरातील शाळाही पुरात वाहून गेल्या आहेत. मंडी जिल्हा प्रशासनाने हवाई दलाला बचावासाठी सतर्क केले आहे. या ठिकाणी वेगाने बचाव कार्य सुरु आहे.
हवाई दल तैनात
एनडीआरएफसह हवाई दलाचीही मदत घेण्यात आली आहे. थलतुखोडमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने आता हवाई दल आणि एनडीआरएफच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. ढगफुटीमुळे हिमाचल प्रदेशातील शिमला आणि कुल्लू जिल्ह्यातील रामपूरला लागून असलेल्या १५-२० भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीखंडच्या डोंगरावरील नैन सरोवराभोवती ढगफुटीमुळे कुरपण, समेळ आणि गणवी नाल्यांना भीषण पूर आला आहे. शिमला जिल्ह्यातील गणवी मार्केट आणि कुल्लू जिल्ह्यातील बागीपुल मार्केटमध्ये नाले ओसंडून वाहत असल्याने मार्केट उध्वस्त झाली आहे.
उत्तराखंडमध्ये मंगळवारपासून पाऊस सुरु आहे. या पावसात अनेक ठिकाणी पूर परिस्थितीत निर्माण झाली, या पुरात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, केदारनाथ रस्त्यावर ढगफुटी झाल्याने राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग जलमय झाला आहे. त्यामुळे केदारनाथ पायी मार्गाचेही मोठे नुकसान झाले आहे. रामबाडा ते लिंचोली दरम्यानच्या पदपथाची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. रामबाडा येथील मंदाकिनी नदीवर असलेले दोन पूल वाहून गेले. हे पूल जुन्या मार्गावर होते. प्रवासी आणि घोडेस्वार या मार्गाचा शॉर्टकट म्हणून वापर करत होते. काल रात्रीच्या पावसात मंदाकिनी नदीच्या जोरदार प्रवाहाने हे पूल वाहून गेले. याशिवाय हरिद्वार, नैनिताल आणि बागेश्वरमधूनही महापुराची चित्रे समोर येत आहेत.
टिहरी जिल्ह्यातील घणसाली केदारनाथ मोटार मार्गावरील जखनियालीजवळ ढगफुटीमुळे ढिगाऱ्याखाली दोन जणांचा मृत्यू झाला तर एक जण बेपत्ता आहे. घणसालीच्या जखनियाली गावात काल रात्री उशिरा झालेल्या आपत्तीच्या घटनेनंतर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जखनियाली निवासी प्रमुख प्रतिनिधी दीपक श्रियाल यांच्याशी फोनद्वारे बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व अधिकाऱ्यांशी बोलून आवश्यक त्या सूचना देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जखनियाली दुर्घटनेत आतापर्यंत एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एक साधू अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे.
कुल्लूमध्ये मुसळधार पावसामुळे बियास आणि पार्वती नद्यांना पूर आला आहे. त्याचा परिणाम तेथील वसलेल्या भागांवर दिसून येत आहे. व्यास नदीच्या उसळत्या लाटांनी एक बांधकाम सुरू असलेली इमारत जमीनदोस्त केली. कुल्लू-मनाली NH 3 नदीच्या प्रवाहानंतर विस्कळीत झाला आहे.
ग्रेटर नोएडामध्ये भिंत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला
ग्रेटर नोएडामध्येही पावसाने कहर सुरूच आहे. दादरी शहरात पावसानंतर मोठी दुर्घटना घडली. येथे भिंत कोसळल्याने एका पुरुष आणि महिलेचा मृत्यू झाला. पावसानंतर भिंत अचानक कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला, सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.
रेल्वेची जुनी सीमा भिंत कोसळली
पावसामुळे उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील रामबाग येथील रेल्वेची जुनी सीमा भिंत कोसळली. सीमा भिंत कोसळल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जवळपास 14 फूट उंच सीमा भिंत कोसळल्याने अनेक वाहने ढिगाऱ्याखाली दबली गेली. सीमा भिंत कोसळल्याने विद्युत खांबाचेही नुकसान झाले आहे.
वायनाड भूस्खलन घटना
दरम्यान, केरळमधील वायनाड या जिल्ह्यात मंगळवारी भूस्खलनाची भीषण घटना घडली आहे. या घटनेत मृतांची संख्या २५६ वर पोहोचली आहे. सोमवारी वायनाडमध्ये निसर्गाने कहर केल्यानंतर, डोंगरमाथ्यावरून येणाऱ्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाने छोट्या इरुवाझिंजी नदीच्या प्रवाहाची दिशा बदलली आणि तिच्या काठावरील सर्व घरे बुडवले. या ठिकाणी परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, 3 दिवस उलटूनही बचावकार्य पूर्ण झालेले नाही. केरळमध्ये आजही हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला असून, पावसाचा हा ट्रेंड 4 ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. केरळमध्ये एकूण 14 जिल्हे आहेत. त्यापैकी 9 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 6 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.