लष्कराच्या रोमियो फोर्सशी संलग्न राष्ट्रीय रायफल्स युनिटने पुंछ पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) सोबत केलेल्या संयुक्त कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनच्या सक्रिय दहशतवाद्याला जम्मू-काश्मीरमधील पुंछमधील मगनर भागातून अटक केली आहे. मोहम्मद खलील असे या व्यक्तीचे नाव असून, त्याला राष्ट्रीय रायफल्स ऑफ रोमियो फोर्सने 30 जुलै रोजी ताब्यात घेतले आहे. असे लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे.
दहशतवादी संघटनेच्या या सहकाऱ्याकडून एक विदेशी पिस्तूल जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेला एक व्हॉट्सॲप नंबरही सापडला आहे, ज्याद्वारे एक हँडलर मोहम्मद खलीलला काम सोपवत होता. राजौरीतील डीएसपी ऑपरेशननुसार, सुरक्षा दलांनी एक एके 47 आणि दोन मॅगझिनही जप्त केल्या आहेत. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीला परिसराची माहिती गोळा करणे आणि दहशतवाद्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे अशी कामे संघटनेकडून सोपवण्यात आली होती.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी खलील हा उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील रहिवासी आहे. पूंछ, राजौरी, किश्तवाड आणि डोडा येथे दहशतवादविरोधी कारवाई करण्यात आली. यावेळी लष्कराला खलीलची माहिती मिळाली आणि त्याला तात्काळ अटक करण्यात आली. मोहम्मद खलील हा हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना सीमेपलीकडून घुसवून दहशत पसरवण्यात मदत करत असे. पाकिस्तानी हस्तकांच्या सांगण्यावरून भारतात घुसणाऱ्या दहशतवाद्यांनाही तो मार्गदर्शन करत असे.
गेल्या काही आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत, ज्यात भारतीय लष्कराचे जवान शहीद झाले आहेत. तेव्हापासून लष्कराकडून सातत्याने खोऱ्यात दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. अनेकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी चालू आहे. 30 जुलै रोजी, राजौरी जिल्ह्यात बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या एका व्यक्तीला सार्वजनिक सुरक्षा कायदा (PSA) अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे.