Kamala Harris : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता फक्त दोन महिने उरले आहेत. या निवडणुकीसाठी
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस या दोघांनीही कंबर कसली आहे. सध्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची मालिका शिगेला पोहोचली आहे. अशातच ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्या वांशिक ओळखीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
त्या जाणूनबुजून कृष्णवर्णीय ओळख सांगत आहेत अशी खोचक टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे . शिकागो येथील नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लॅक जर्नालिस्ट्सच्या अधिवेशनाला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, ‘त्या (कमला हॅरिस) नेहमी स्वत:ला भारताशी जोडलेली समजतात. त्यांनी अनेकवेळा भारतीय वारशाचा प्रचार केला आहे. पण आता अचानक त्या कृष्णवर्णीय झाल्या आहेत. त्या कृष्णवर्णीय कधीपासून झाल्या? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
ट्रम्प पुढे म्हणाले, मला माहित नाही की त्या भारतीय आहे की कृष्णवर्णीय? मी भारतीय आणि कृष्णवर्णीय दोघांचा आदर करतो पण हॅरिसला त्यांच्याबद्दल आदर आहे असे मला वाटत नाही? कारण त्या नेहमीच भारतीय आहेत असा गाजावाजा करत असतात आणि स्वतःला भारताशी जोडलेली सजतात, पण आता त्या अचानक कृष्णवर्णीय झाल्या आहेत.
कमला हॅरिस यांच्या वांशिक ओळखीवर प्रश्न का उपस्थित होत आहेत?
अमेरिकन निवडणुकीत कृष्णवर्णीय, दक्षिण आशियाई वंशाचे लोक आणि हिस्पॅनिक लोकांची लक्षणीय मतपेढी आहे. बायडेन यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यापासून कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाची उमेदवारी स्वीकारली आहे. त्यांना कृष्णवर्णीय आणि दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांकडून सतत पाठिंबा मिळत आहे. अशा स्थितीत ट्रम्प यांनी त्यांच्या ओळखीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात कमला हॅरिसच्या रेटिंगमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी उमेदवारीवरून माघार घेतल्यानंतर, कमला हॅरिस यांच्या मान्यता रेटिंगमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ओबामांचा पाठिंबा
26 जुलै रोजी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांनी कमला हॅरिस यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. ओबामांनी हॅरिस यांना फोन करून त्यांना पाठिंबा दर्शवला.
कमला हॅरिस ‘या’ अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती
2020 च्या निवडणुकीत कमला हॅरिस या पहिल्यांदाच सिनेटवर निवडून आल्या होत्या. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. कमला हॅरिसची आई भारतीय होत्या, तर वडील जमैकाचे होते. त्यांचा जन्म कॅलिफोर्नियातील ओकलंड येथे झाला. कमला हॅरिस या केवळ अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनलेल्या पहिल्या महिला नाहीत तर या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या आशियाई अमेरिकन आणि आफ्रिकन अमेरिकन महिला देखील आहेत.