Pune Rain Update : पुण्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे संसार पाण्यात गेले तर काहींना आपला जीव गमवावा लागला. या पुरात अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकदा पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
तसेच कोकण किनारपट्टी, घाटमाथा, विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीवरील हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रातून वेगाने बाष्पयुक्त वारे किनारपट्टीवर येत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे किनारपट्टीसह पश्चिम घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुण्यासह महाराष्ट्रातही काही ठकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना देखील पावसाचा (IMD Alert) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह ठाणे सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, मात्र दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली होती, आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.