अहमदनगर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे पाटलांना पराभूत केले. याच सुजय विखे पाटलांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. आता सुजय विखे पाटील हे संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुजय विखे पाटलांनी विधानसभेची तयारी केली असून पक्षाकडे याबाबत इच्छा व्यक्त केल्याची देखील माहिती सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जनतेचा आणि पक्षाचा निर्णय झाला तर निवडणूक लढण्यास तयार असल्याचे सुजय विखे पाटलांनी सांगितले आहे.
सुजय विखे पाटील हे संगमनेरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर त्यांचा सामना थेट काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्याशी रंगू शकतो. संगमनेर विधानसभेत बाळासाहेब थोरात हे सध्या विद्यमान आमदार आहेत. सुजय विखे यांनी राहुरी विधानसभेतून निवडणूक लढली तर शरद पवार गटाचे माजी मंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत निवडणूक रंगू शकते.
‘शिर्डी विधानसभा ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाईल, अशी माझी अपेक्षा आहे. कारण पक्षाचा निर्णय होणे अद्याप बाकी आहे. तिकीट कोणाला मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे. पक्ष निर्णय घेईल, पक्ष त्यांना संधी देईल. आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारात साहेबच सर्वप्रथम असणार आहेत. राहिला मुद्दा माझा, आता मला बऱ्यापैकी वेळ आहे, त्यामुळे आजूबाजूंच्या मतदार संघाचा आढावा घेऊ’, असे सुजय विखे पाटील म्हणाले आहेत. यावरुन आता सुजय विखे पाटील हे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.