हमास प्रमुख हानिया आणि हिजबुल्लाचा सर्वोच्च कमांडर यांच्या मृत्यूनंतर इस्रायलमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि मिशनच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे. ॲडव्हायझरी जारी करताना, दूतावासाने इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी नोंदणी फॉर्मही जारी केला आहे, जेणेकरून इस्रायलमध्ये किती भारतीय राहतात याची माहिती मिळू शकेल. इस्रायलच्या गाझा पट्टीमध्ये हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह यांच्यासोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायझरी जारी केली आहे. तेल अवीवमधील भारतीय दूतावासाने इस्रायलमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळून सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगितले आहे.
ॲडव्हायझरीत नमूद केल्यानुसार भारतीय दूतावास संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच आपल्या लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी इस्रायली अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे. दूतावासाच्या वतीने नागरिकांना सावध राहण्यास आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे. याशिवाय, आपत्कालीन परिस्थितीत, दूतावासाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्यास सांगितले आहे. दूतावासाने टेलिकम्युनिकेशनसह ईमेलही जारी केला आहे. तसेच ज्या भारतीयांनी दूतावासात नोंदणी केलेली नाही त्यांनाही एका लिंकद्वारे त्वरित नोंदणी करण्यास सांगितले आहे.दूतावासाने सर्व भारतीयांसाठी नोंदणी फॉर्म सामायिक केला आहे, जेणेकरून ते नोंदणी करू शकतील आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करू शकतील.
इस्रायल आणि हमाससह विविध गटांमधील संघर्षाच्या दरम्यान मध्य पूर्वमध्ये अजूनही तणाव कायम आहे. गेल्या वर्षी ८ ऑक्टोबरपासून इस्रायली सैन्य आणि हिजबुल्ला यांच्यात सुरु झालेला सीमापार हिंसाचार अजूनही सुरू आहे. इस्त्राईल आणि हिजबुल्ला यांच्यातील लढाई सुरू झाल्यापासून देशाच्या उत्तर सीमेवरील इस्रायली लक्ष्यावर नुकताच झालेला रॉकेट हल्ला हा सर्वात प्राणघातक हल्ला होता.