राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 2025 मध्ये 100 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त संघाकडून कोणताही मोठा कार्यक्रम किंवा उत्सव आयोजित केला जाणार नाही, उलट संघाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न केले जातील. संघाच्या इंदोर येथे आयोजित संपर्क विभागाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्क विभागाची बैठक मध्यप्रदेशातील इंदोर येथे सुरू आहे. या बैठकीचा रविवारी 4 ऑगस्ट रोजी समारोप होणार आहे. ही बैठक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या नेतृत्त्वात होत असून बैठकीत देशभरातून 180 हून अधिक संघाचे अधिकारी सहभागी झाले आहेत. या बैठकीसंदर्भात संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले शताब्दी वर्ष साधेपणाने साजरे करेल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मोठे सेलिब्रेशन टाळले पाहिजे यावर सर्वांचे एकमत झाले. त्याऐवजी सेवाकार्यात वाढ करून अभिनव पद्धतीने समाजात संघ कार्य पोहचवावे असा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
संघ सोशल मिडीयावर सक्रिय असून यामाध्यमातून तरुणांपर्यंत संघाची विचारधारा आणि संघ कार्याची माहिती पोहचवाली असे देखील या बैठकीत ठरले. संघाच्या संपर्क विभागाने अयोध्येतील रामललाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने हिंदू समाज जागृतीत महत्त्वाची भूमिका वठवली होती. येत्या काळात संपर्क विभागाने समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी आणि संघाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यत पोहचवण्यासाठी विविध उपक्रम राबवले पाहिजे यावर बैठकीत भर देण्यात आला. यासोबतच संघाने सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त सहभाग वाढवून समाजात जागृती करण्याचे काम करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.
संघाबद्दल ज्यांना फारशी माहिती नाही, पण संघाबद्दल चुकीची धारणा आहे अशा लोकांना संघकार्य आणि विचारसरणीची जाणीव करून देऊन त्या लोकांचे गैरसमज कसे दूर होतील याकडे लक्ष दिले जाणार आहे. तसेच देशातील सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक शक्ती मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे आणि सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचले पाहिजे यावर बैठकीत शिक्का मोर्तब झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.