राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात गेले काही दिवस चालू आहे. परंतु, आपण राज्याच्या राजकारणात राहणार असून अध्यक्ष बनणार ही चर्चा केवळ प्रसिद्धी माध्यमांमध्येच असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी काल शुक्रवारी स्पष्ट केले.
नागपूर जिल्हा नियोजन समितीची काल बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. बैठकीत आलेल्या सर्व नेत्यांमध्येही फडणवीस हे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची कुजबूज सुरू होती. पण शेवटी फडणवीस यांनीच या विषयावरील पडदा उचलला. ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यामुळे ते सध्यातरी दिल्लीत जाणार नसून राज्यातच काम करतील हे देखील स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात फडणवीस यांना विचारले असता आपण राज्यातच राहणार असून राष्ट्रीय राजकारणात जाणार नसल्याचे सांगितले. आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनणार ही चर्चा केवळ माध्यमांमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत कालच वक्तव्य केले. महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्कृष्ठ संघटक आहेत. राज्यातील नेत्यांना ते दिल्लीत जाऊ नये असेच वाटत आहे. फडणवीसांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्त्व घेईल. मात्र, राज्यातील 14 कोटी जनतेच्या कल्याणासाठी फडणवीसांचे शासनातील व संघटनेतील स्थान महत्वाचे आहे. ते महाराष्ट्रात राहावे असेच आम्हाला वाटते, असे बावनकुळे यांनी सांगितले होते.